रावेरमध्ये काँग्रेसची पदयात्रा ; ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी
अनुच्छेद 324 नुसार स्वतंत्र व पारदर्शक निवडणुका घेण्याची मागणी ; प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन
रावेर (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा मुद्दा उपस्थित करत रावेर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा रावेर तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पारदर्शक पद्धत्तीने निवडणुका घ्या
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत स्वतंत्र आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची मागणी केली. भारतीय संविधानातील अनुच्छेद 324 नुसार निवडणुकांचे नियंत्रण, निर्देशन आणि देखरेख करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे. या तरतुदीनुसार निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.





या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक व्यवस्थेबाबत आपल्या मागण्या मांडत संबंधित यंत्रणेने त्याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देऊन पक्षाच्या वतीने मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या.
यांचा पदयात्रेत सहभाग
या पदयात्रेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, शहराध्यक्ष धुमा तायडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत महाजन, सामाजिक कार्यकर्ते सावंत मेढे, सुनील कोंडे, इम्रान शेख, अॅड.योगेश गजरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रावेर शहरात काढण्यात आलेल्या या पदयात्रेद्वारे काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
