चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांनी उचलले टोकाचे पाऊल


चाळीसगाव (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : चाळीसगाव तालुक्यात शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगवी, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडे बुद्रुक येथे घडलेल्या या घटनांमध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या तिन्ही घटनांमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

विवाहितेची आत्महत्या
पहिल्या घटनेत प्रतीक्षा राहुल राठोड (28, रा.मिलदी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) या विवाहित महिलेचा समावेश आहे. त्या गेल्या आठ दिवसांपासून पतीसह सांगवी येथे आपल्या नणंदेकडे आल्या असताना 16 ऑक्टोबर रोजी सकाळी नणंद आणि तिचे पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर घराबाहेर मुले खेळत असताना प्रतीक्षा राठोड यांनी गळफास लावला. मुले घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.






दुसर्‍या घटनेत वडाळा-वडाळी येथील शिवाजी शेनपडू अहिरे (38) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

तिसर्‍या घटनेत मुंदखेडे बुद्रुक येथील संदीप कैलास पाटील (25) हा तरुण शुक्रवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यालाही चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.

या तिन्ही घटनांप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिन्ही घटनांमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !