कर्तव्यनिष्ठ खाकीला भुसावळात कौतुकाची थाप ! पोलिसांच्या कामगिरीतून जनतेचा विश्वास अधिक दृढ
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या हस्ते 11 कर्मचार्यांचा गौरव ; सहकार्यांना प्रोत्साहन आणि जनतेच्या विश्वासाला बळ देणारा उपक्रम
भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : खाकी वर्दी म्हणजे केवळ अधिकाराचे प्रतीक नव्हे तर जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी, संकटसमयी धावून जाण्याची तत्परता आणि गुन्हेगारांविरुद्ध लढण्याचे धैर्य ! कर्तव्य बजावताना अनेकदा स्वतःच्या सुखसोयी बाजूला ठेवणार्या पोूहस कर्मचार्यांच्या कामाची दखल घेतली गेली तर त्यांच्या मेहनतीला नवी ऊर्जा मिळते आणि सहकार्यांनाही अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. भुसावळ पोलीस उपविभागात याच सकारात्मक भावनेतून दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणार्या कर्मचार्यांचा ‘टॉप कॉप’ उपक्रमांतर्गत गौरव केला जातो. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्याहस्ते नुकताच 11 पोलीस कर्मचार्यांचा करण्यात आलेला सन्मान हा केवळ त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव नसून, प्रामाणिक सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि जनतेच्या विश्वासाचे मोल अधोरेखित करणारा आहे. गुन्ह्यांची उकल करून नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव करून देणार्या या खाकीतील हातांना मिळणारी कौतुकाची थाप म्हणजेच अधिक सक्षम, संवेदनशील आणि विश्वासार्ह पोलीस दलाच्या उभारणीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल!
दरमहा होतो सन्मान
भुसावळ उपविभागात पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या अंमलदारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जून-2023 पासून पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत भुसावळ उपविभागातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांकडून दरमहा सर्वोत्कृष्ट काम करणार्या अंमलदाराची निवड केली जाते.





11 कर्मचार्यांचा सन्मान
शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी आयोजित गुन्हे बैठकीदरम्यान ऑगस्ट व सप्टेंबर 2026 मधील उत्कृष्ट कामगिरी करणार्या 11 पोलीस अंमलदार व अधिकार्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्याहस्ते झाडाचे रोपटे व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
ऑगस्ट 2026 चे ‘टॉप कॉप’
भुसावळ शहरच्या हवालदार हर्षा निवृत्तीनाथ चौधरी यांनी 2015 ते 2025 पावेतो प्रलंबित गुन्ह्यांची डॅशबोर्डवर योग्य फिडींग करून उल्लेखनीय काम केले तर बाजारपेठचे कॉन्स्टेबल मोहम्मद जाफर अमीनोद्दीन यांनी ई-ऑफिस, ईएचआरएमएस व मुद्देमाल मदतनीस म्हणून उत्कृष्ट काम केले तर भुसावळ तालुक्याचे हवालदार इस्तियाक यांनी जामठी व बोदवडला कायदा-सुव्यवस्था राखत गणेश विसर्जन बंदोबस्तात उत्कृष्ट काम केले. नशिराबादचे कॉन्स्टेबल भरत शशिकांत बाविस्कर यांनी मपोका 56 अंतर्गत आठ व मपोका 55 अन्वये एक एमपीडीए अंतर्गत एक प्रस्ताव यशस्वीरित्या तयार करण्यात व बंदोबस्तात उल्लेखनीय काम केल्याने तर शहर वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल शिवाजी संतोष पाटील यांनी वाहतूक शाखेत 351 केसेस करून एक लाख 63 हजार 850 रुपयांची दंड वसुली केली.
सप्टेंबर 2026 चे ’टॉप कॉप’
भुसावळ शहरचे कॉन्स्टेबल कुणाल विठ्ठल सोनवणे यांनी आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह पकडले तर भुसावळ बाजारपेठचे कॉन्स्टेबल पंकज प्रकाश तायडे यांनी समन्सची अधिकाधिक बजावणी केली. भुुसावळ तालुक्याचे कॉन्स्टेबल हेमंत प्रकाश मिटकरी यांनी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासह आरोपीला अटक करण्यात मदत केली शिवाय नशिराबादचे कॉन्स्टेबल पंकज देविदास सोनवणे प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे निकाली काढत कायदा-सुव्यवस्था बळकट राखण्यास मदत केली तर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे निवांत जाधव यांनी गंभीर गुन्ह्यात तत्काळ आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. त्याशिवाय विशेष कामगिरी करणार्या भुसावळ शहर वाहतूक शाखेतील हवालदार हेमराज तुकाराम झटके यांनी खुनाच्या गुन्ह्यात उत्कृष्ट पैरवी केल्याने आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा झाल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, परिवेक्षाधीन उपअधीक्षक प्रशांत दरेकर, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक महेश गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक निलेश गायकवाड, नशिराबाद प्रभारी सहा.निरीक्षक योगीता नारखेडे, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक राहुल भंडारे व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
