पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयातून भुसावळात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : कुख्यात बाबा काल्यासह चौघांविरोधात गुन्हा
गणेश वाघ
भुसावळ (रविवार, 18 ऑक्टोबर 2026) : पिस्टलासोबतचा फोटो पोलिसांना दाखवल्याच्या संशयायतून शहरातील 17 वर्षीय तरुणीला चौघांनी धमकावत मारहाण केली तर एकाने तरुणीला जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला. या प्रकरणी कुख्यात बाबा काल्यासह चौकडीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
काय घडले भुसावळात ?
शहरातील घोडेपीर बाबा परिसरातील मुस्लीम कॉलनी भागात 17 वर्षीय पीडीता वास्तव्यास आहे. 17 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास संशयीत बाबा काल्या उर्फ आसीफ बेग असलम बेग, त्याचा मित्र मोहसीन उर्फ बाटूक, हसनैन व त्यांचा अनोळखी साथीदार पीडीतेच्या घरात शिरले. यावेळी संशयीताने आपला पिस्टलासोबतचा व्हिडिओ पोलिसांना का दाखवला ? म्हणत पीडीतेला बेल्टने मारहाण केली व पीडीतेला अंगावरील कपडे काढायला लावून त्याचा संशयीतांनी व्हिडिओ बनवत तो व्हायरलची धमकी दिली.





जंगलात नेत अत्याचाराचा आरोप
संशयीतांपैकी एक मोहसीन उर्फ बाटूक याने पीडीतेला बाबा काल्यापासून वाचवतो म्हणून गोड बोलून दुचाकीवर बसवून जंगलात नेले व पीडीतेवर अत्याचार केला व आमचे नाव कुणालाही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचा आरोप पीडीतेने तक्रारीत केला आहे.
बाबा काल्यासह चौकडीविरोधात गुन्हा
17 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीवरून आसीफ बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या, शेख मोहसीन शेख सलीम उर्फ बाटूक, हसनेन शेख कुतूबुद्दीन व त्यांच्या सोबतच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत. संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
