आई-वडिलांशी वाद झाल्यानंतर तीन अल्पवयीन मुलींनी सोडले घर ; सुरत-भुसावळ एक्स्प्रेसमध्ये जळगाव रेल्वे सुरक्षा बलाने घेतला सुरक्षित ताबा !
‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेत आरपीएफची तत्परता : अमरोली पोलिसांकडे तरुणींचा ताबा
जळगाव (रविवार. 18 ऑक्टोबर 2026) : आई-वडिलांशी कुठल्यातरी विषयातून वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात घरात कोणालाही न सांगता निघालेल्या तीन अल्पवयीन मुलींंनी 19007 सुरत-भुसावळ एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. आई-वडीलांनी सुरत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्यानंतर मुलींचे फोटो सर्व ठाण्यांना पाठवण्यात आले. जळगाव रेल्वे सुरक्षा बलालाही अलर्ट मिळाल्यानंतर त्यांनी यंत्रणा सतर्क केली. जळगाव रेल्वे स्थानकावर या मुलींच शोध घेतल्यानंतर त्यांना ताब्यात घेवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. सुरतच्या अमरोली पोलिसांना सूचित करीत नंतर या मुलींचा 17 रोजी यंत्रणेने ताबा दिला.
गुप्त माहिती मिळताच आरपीएफची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, सूरत पोलिसांकडून आरपीएफ जळगावच्या निरीक्षकांना ट्रेन क्रमांक 19007 मध्ये तीन अल्पवयीन मुली प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली होती. या मुली आई-वडिलांवर नाराज होऊन घरातून निघाल्याचेही कळविण्यात आले होते. संबंधित मुलींची छायाचित्रेही पोलिसांना पाठविण्यात आली होती. ही माहिती मिळताच जळगाव आरपीएफ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय बी.ए.चौधरी, हेड कॉन्स्टेबल आशिफ शेख आणि हेड कॉन्स्टेबल संजय कुमार यांनी तातडीने कारवाई केली. सुरत-भुसावळ एक्स्प्रेस जळगाव स्थानकातील फलाट क्रमांक 3 वर शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे 12.55 वाजता दाखल झाल्यानंतर रेल्वेची तपासणी करण्यात आली.





मुलींना सुरक्षित ठिकाणी ठेवले
तपासणीदरम्यान तिन्ही अल्पवयीन मुली आढळून आल्या. आरपीएफ कर्मचार्यांनी त्यांना सुरक्षितपणे रेल्वेतून उतरवून जळगाव आरपीएफ ठाण्यात आणले. तेथे महिला सफाई कर्मचारी नंदा कौडी यांच्या देखरेखीखाली त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले. मुली आढळल्याची माहिती सूरत शहरातील अमरोली पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता अमरोली पोलीस ठाण्याचे एएसआय एम.पी.परमार आणि पोलीस कर्मचारी परबत चौधरी जळगाव आरपीएफ ठाण्यात दाखल झाले.
अमरोली पोलिसांकडे सुपूर्द
आरपीएफचे उपनिरीक्षक मनोज सोनी यांनी तिन्ही मुलींना सुरक्षित व सुस्थितीत अमरोली पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द केले. रेल्वे प्रवासादरम्यान संकटात सापडलेल्या अल्पवयीन मुलींना सुरक्षित बाहेर काढण्यात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जळगाव आरपीएफ पथकाने तत्परता दाखविली.
