भुसावळच्या तुकाराम नगरात धाडसी घरफोडी ; चार लाख 24 हजारांचा ऐवज लंपास
मुलीच्या शिक्षणासाठीची रोकड, दागिने चोरट्यांनी लांबवले
भुसावळ (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : शहरातील तुकाराम नगरात बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी तब्बल चार लाख 23 हजार 915 रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मुलीच्या शिक्षणासाठी घरात ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी रविवार, 18 रोजी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले भुसावळात ?
भुसावळच्या तुकाराम नगरातील दत्त मंदिराजवळील म्हाळसाई इमारतीत लिलाधर पंडित बोरोले (59) हे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी ऋतुजा पुण्यात शिक्षण घेतले तर पत्नी सुनिता या दीपनगरात नोकरीस आहेत. शनिवार, 17 रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास लिलाधर बोरोले डोळ्यांच्या उपचारासाठी स्वतःच्या वाहनाने जालना येथे गेले होते. सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून ड्युटीला गेल्याने दिवसभर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली.





भर दिवसा घरफोडी
दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जालन्याहून परतल्यानंतर लिलाधर बोरोले यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. मुख्य दरवाजाची कडी-कोंडी तोडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आत पाहणी केली असता दोन्ही शयनकक्षांतील सामान अस्ताव्यस्त होते आणि कपाटही फोडले होते. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच लिलाधर बोरोले यांनी इमारतीतील अशोक तुकाराम बोरोले आणि मोहन दत्तू बोरोले यांना कळवले. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करून पाहणी केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र पगारे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांनी कपाट तोडून एक लाख 14 हजार 492 रुपये किंमतीची साडेचार तोळ्यांची सोन्याची पोत, 28 हजार 623 रुपयांच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, पाच हजार 600 रुपयांच्या दोन ग्रॅम वजनाच्या लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 25 हजार 200 रुपयांची 9 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आणि मुलीच्या शिक्षणासाठी कपाटात ठेवलेली दोन लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण चार लाख 23 हजार 915 रुपयांचा ऐवज लांबवला.
