साकळीजवळ कार-दुचाकीचा अपघात : तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर


यावल (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026)  यावल-चोपडा मार्गावर साकळी या गावाजवळील साईराम जिनिंगच्या समोर दुचाकी आणि कारचा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तिघे जखमी झाले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यातील दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आल. अपघातानंतर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळेसह कर्मचार्‍यांनी अपघातग्रस्तांना मदत करीत जखमींना रुग्णालयात पाठवले. अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.

काय आहे प्रकरण
यावल-चोपडा रस्त्यावरील साकळी गावाजवळ साईराम जिनिंग आहे. या जिनिंगच्या समोर यावलकडून चोपड्याकडे कार (क्रमांक एम. एच. 05 बी. एल. 4749) घेऊन चालक विनोद कुमार हा श्रीक्षेत्र मनुदेवी येथे जात होता तर साकळी कडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम. पी. 68 झेड. एफ. 1037) घेऊन प्रवीण किशोर तेली (21), हर्षल राजेंद्र माळी (17) व तय्यब राजू तडवी (16, तिघे राहणार साकळी) हे जात असताना दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तिघे जखमी झाले.






दोघा जखमींना जळगावात हलवले
अपघात घटनास्थळी शासकीय वाहनाद्वारे जात असलेल्या पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आणि तातडीने त्यांना रुग्णालयात पाठवले, ग्रामीण रुग्णालय यावल येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ. शहादाब शेख, कादर तडवी, भूषण गाजरे यांनी जखमींवर प्रथमोपचार केले तर यातील प्रवीण तेली याला डोक्याला जबर दुखापत आहे आणि हर्षल माळी याला देखील डोक्यास दुखापत असल्याने दोघांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात स्थळावर जाऊन वाहतूक पोलीस कर्मचारी अर्षद गवळी, दिवाकर जोशी यांनी अपघातग्रस्त वाहन तातडीने तेथून यावल पोलीस ठाणे जमा केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !