भुसावळातील वडापाव विक्रेत्याला एक वर्षाची शिक्षा ; कारण वाचून बसेल धक्का

धनादेशाची रक्कम सहा लाख 80 हजार रुपये देण्याचे आदेश : रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास


भुसावळ (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : धनादेश अनादर प्रकरणात भुसावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी मनोज बाळचंद्र चौधरी यांना एक वर्षाची साधी कैद आणि धनादेशाच्या दुप्पट रकमेचा म्हणजेच सहा लाख 80 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले शिवाय दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल 16 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर करण्यात आला.

स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून वाद
भुसावळच्या जुना सातारा परिसरातील रहिवासी व व्यापारी संजय पांडुरंगनाथ अहिरे यांनी मनोज बाळचंद्र चौधरी यांच्यासोबत सन 2016 मध्ये स्थावर मालमत्तेबाबत नऊ लाख 60 हजार रुपयांचा तोंडी सौदा केला होता. या व्यवहारापोटी अहिरे यांनी तीन लाख 40 हजार रुपये बयाणा रक्कम चौधरींना दिली होती. काही कालावधीनंतर तांत्रिक कारणांमुळे दोघांनी हा व्यवहार रद्द केला. त्यानंतर चौधरी यांनी बयाण्याची रक्कम परत करण्यासाठी अहिरे यांना तीन लाख 40 हजार रुपयांचा धनादेश दिला.






बँकेत धनादेश न वटल्याने खटला
धनादेशावरील तारीख निश्चितपणे वटेल, असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अहिरे यांनी धनादेश बँकेत जमा केला असता, खात्यात अपुरी रक्कम असल्याने तो अनादरित (चेक बाऊन्स) झाला त्यामुळे अहिरे यांनी भुसावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात मनोज चौधरी यांच्याविरुद्ध संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक 93/2017 दाखल केला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या बचावातील कथनात तार्किक विसंगती आढळल्या.

आरोपीला एक वर्षांची शिक्षा
या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एम.बगे यांनी 16 ऑक्टोबर 2026 रोजी निकाल जाहीर करत आरोपी मनोज चौधरी यांना एक वर्षाची साधी कैद आणि सहा लाख 80 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी संजय अहिरे यांच्यातर्फे भुसावळातील प्रसिद्ध अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !