पोलिसांना चकवा देण्यासाठी टक्कल ; एआयच्या मदतीने आरोपीचा शोध, बडनेरा स्थानक येताच पसार होण्याच्या प्रयत्नातील जळगावातील आरोपीला बेड्या

एक कोटी 24 लाखांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी वॉण्टेड : जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी


जळगाव (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : हर्बल लाईफमध्ये गुंतवणुकीच्या आमिषातून एक कोटी 24 लाखांचा गंडा घालून पसार झालेल्या आरोपीने ओळख लपवण्यासाठी टक्कल केली व पोलीस येत असल्याची चाहूल लागताच शहरेही बदलली तर ट्रॅक न होण्यासाठी अनेकदा मोबाईल नंबरही बदलले. आरोपी पुढे व पोलीस मागे हा वर्षभरापासून खेळ सुरू होता. आरोपी हा मुंंबई ते नागपूर दुरांतो प्रवास करीत असल्याची माहिती जळगाव आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली. पथकाने गाडीतच आरोपीचा शोध सुरू केल्यानंतर बडनेरा स्थानकाजवळ गाडीचा वेग कमी होताच आरोपीने उडी मारताच पथकाने पाठलाग करीत त्याला बेड्या ठोकल्या. दीपेश कमलेश रुपानी (प्लॅट क्रमांक सात, तिसरा मजला, सुमन रेसीडेन्सी, गणपती नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दोन गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी
रामानंद नगर पोलिसा आरोपी दीपेश रुपाणी विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादींचा विश्वास संपादन करून आरोपीने एकूण एक कोटी 23 लाख 86 हजार रुपयांची फसवणूक आरोपीने केल्याचा आरोप आहे.





एक वर्षांपासून पसार : लोकेशनही बदलले
आरोपी गेल्या वर्षांपासून पसार होता. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचा राजस्थानमधील जोधपूर, अमरावती, नागपूर, खामगाव आणि बडनेरा अशा विविध ठिकाणी शोध घेतला मात्र आरोपी वारंवार मुक्कामाची ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. तो मोबाईल क्रमांक बदलून तसेच इतर व्यक्तींच्या नावावरील सिमकार्डचा वापर करून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याने त्यास पकडण्यात मोठी अडचण येत होती. आरोपीने पकडले व ओळखले जावू नये यासाठी टक्कलही केली.

तांत्रिक विश्लेषणातून मिळाली महत्त्वाची माहिती
आरोपी गोवा राज्यात गेल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळाली. त्यानंतर आरोपी सीएसएमटी ते नागपूर असा प्रवास दूरांतो एक्स्प्रेसने करत असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले. भुसावळ रेल्वे स्थानकावर दूरांतो एक्स्प्रेसला अवघ्या पाच मिनिटांचा थांबा असल्याने पोलिसांनी तत्काळ गाडीत शोध घेतला मात्र आरोपी सापडला नाही. त्यानंतर बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ गाडीचा वेग कमी झाल्याचे पाहून आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांच्या पथकाने त्याला पाहताच धावत्या गाडीतून उड्या टाकत पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ, पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील, समाधान पाटील, घनश्याम पवार, विजय शिरसाठ यांनी ही कारवाई केली.

तक्रारदारांना समोर येण्याचे आवाहन
हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाली असल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !