जळगाव-भादली पाचव्या रेल्वे मार्गावर उद्या वेग चाचणी ; रुळांपासून दूर राहण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
बुधवारी रेल्वे संरक्षा आयुक्तांकडून तपासणी ; 11.51 किमी मार्गावर स्पीड ट्रायल होणार
भुसावळ (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : जळगाव-भादलीदरम्यानच्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या तपासणीसाठी बुधवारी, 21 ऑक्टोबर रोजी वेग चाचणी (स्पीड टेस्ट) घेण्यात येणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वेगाड्या अधिक वेगाने धावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केले आहे.
आज वेग चाचणी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत जळगाव-भादली या 11.51 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील पाचव्या रेल्वे मार्गाच्या सुरूवातीसंदर्भात रेल्वे संरक्षा आयुक्त, मध्य सर्कल, मुंबई यांच्यामार्फत 21 ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा भाग म्हणून संबंधित रेल्वे मार्गावर वेग चाचणी (स्पीड ट्रायल) घेतली जाणार आहे. वेग चाचणीदरम्यान रेल्वेगाड्या अधिक वेगाने धावू शकतात त्यामुळे रेल्वे रुळांच्या जवळ जाणे, रुळ ओलांडणे किंवा रेल्वे मार्गाच्या कडेला उभे राहणे धोकादायक ठरू शकते. अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नागरिक, शेतकरी, शेतमजूर, मुले आणि तरुणांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. चाचणी सुरू असताना पाचव्या रेल्वे मार्गासह सर्व रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे. रेल्वे मार्गाच्या परिसरात विनाकारण जाणे टाळावे तसेच रुळ ओलांडण्याचा किंवा रुळांजवळ थांबण्याचा धोका पत्करू नये.




जनसुरक्षेला प्राधान्य
रेल्वे मार्गावरील वेग चाचणी सुरक्षितपणे पार पडावी आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून चाचणीदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.
