भुसावळात आज दुर्गा विसर्जन : पोलीस प्रशासन सज्ज
204 मंडळांतर्फे आदिशक्तीचे विसर्जन : ड्रोनची मिरवणुकीवर असेल नजर
भुसावळ (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : शहरात बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळणार असून पोलीस प्रशासनाकडून विसर्जनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा 204 दुर्गा मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार असून 52 मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. मिरवणूक मार्गासह मशीद चौक आणि संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, फिरते कॅमेरे व ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. वाद्य वाजविण्यास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल तर बसस्थानकाचे एका दिवसासाठी स्थलांतर तर विसर्जनस्थळी पालिकेकडून दरवर्षाप्रमाणे सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण
आदिशक्तीच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर आता बुधवार, 21 रोजी दुर्गा विसर्जनाची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. यंदा शहरात 204 दुर्गा मंडळांनी मूर्तीची स्थापना केली तर शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत 52 मंडळांचा सहभाग राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य मिरवणुकीत सहभागी असलेल्या मंडळांवर तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटिव्ही, फिरते कॅमेरे व ड्रोनची नजर राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विसर्जन मिरवणूकीत वाद्य वाजविण्यास रात्री 12 वाजेपर्यत परवानगी असेल.




वाघूरच्या बॅक वॉटरमध्ये विसर्जन
बुधवार, 21 रोजी शहरातील नृसिंह मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल. सहभागी मंडळांना पोलीस प्रशासनाकडून क्रमांक दिले जाणार असून मुख्य मिरवणुकीत सहभागी न होणारी मंडळे तापी नदीवर किंवा वाघूर धरणाच्या गारखेडा बॅकवॉटरमध्ये मूर्ती विसर्जन करतील. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तापीकाठावर प्रखर प्रकाश देणारे दिवे, पट्टीच्या पोहणार्यांचे पथक तसेच अन्य सुविधा दिल्या गतवर्षाप्रमाणे पुरवण्यात आल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वात बंदोबस्ताचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे.
