जळगाव हादरले : मध्यस्थी बेतली तरुणाच्या जीवावर : एकाला अटक
दुचाकीचा लाईट चमकवल्याच्या वादातून टोळक्याचा हल्ला : एक गंभीर
जळगाव (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : विजयादशमीचा सर्वत्र उत्साह असतानाच जळगावजवळील खेडी शिवारात मात्र गरबा-दांडिया सुरू असताना टोळक्याच्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ऐन सणाच्या दिवशी झालेल्या हत्येने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी एका संशयीताला अटक केली आहे. किरण विठ्ठल पाटील (जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे तर किशोर छगन पाटील असे जखमीचे नाव आहे.
काय घडले जळगावात ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दसर्यानिमित्त माउली नगर परिसरात दुर्गा मंडळाच्या वतीने गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले. रात्री उशिरा महामार्गालगत हा कार्यक्रम सुरू असताना दुचाकीचा दांडिया खेळणार्या महिलांवर हेडलाइट चमकला. यावरून विचारणा करण्यात आली असता दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत घडल्याची माहिती आहे.




मध्यस्थी करताच चॉपरने छातीत वार
वाद मिटवण्यासाठी किरण विठ्ठल पाटील आणि किशोर छगन पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र याचदरम्यान एका संशयिताने चॉपर काढून किरण पाटील यांच्या छातीत वार केल्यानंतर पाटील गंभीर जखमी होवून मृत झाले तर किशोर पाटील हेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. दसर्याच्या रात्री घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तीन संशयीतांविरोधात गुन्हा
या प्रकरणात तीन संशयीतांचा सहभाग असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत तर एका संशयीताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
