दरोड्याच्या गुन्ह्यातील कुविख्यात बाबा काल्या न्यायालयातून पसार


भुसावळातील घटना ; शौचाचा बहाण करीत पोलिसांच्या हातावर दिली तुरी

भुसावळ- दरोड्याच्या गुन्ह्यातील कुविख्यात आरोपीने शौचाचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी देत न्यायालयातून पळ काढल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आसीफ बेग (बाबा काल्या) असलम बेग असे पसार आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या शोधार्थ शहरातील तीनही पोलिस ठाण्यांतील कर्मचारी रवाना झाले आहेत.

शौचाचा बहाणा करीत काढला पळ
अट्टल आरोपी असलेल्या बाबा काल्याविरुद्ध जबरी चोरी, रस्ता लुटीसह शरीराविरुद्ध हल्ला केल्याचे तब्बल सहा गुन्हे दाखल आहेत. 5 जुलै रोजी रजा चौक परीसरात अरबाज शकील आझाद (22) याच्या खिशातील सहा हजार 200 रुपये काढताना तक्रारदाराने प्रतिकार केल्याने बाबा काल्याने त्याच्यावर चाकू हल्ला करून पळ काढला होता तर आरोपीच्या 17 जुलै रोजी मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. आरोपी जळगावच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीवर असल्याने त्याच्यासह कलीम शेख या दोघांना न्यायालयीन कामानिमित्त शुक्रवारी दुपारी जळगाव कारागृहातील विकास पाटील यांच्यासह तीन पोलिस कर्मचारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात घेवून आले होते. आरोपी बाबा काल्याने शौच लागल्याचा बहाणा केला तर यावेळी कर्मचारी शौचालयाबाहेर पहारा देत असताना आरोपीने शौचालयाचा नळ सुरू करीत खिडकीच्या काचा काढून पळ काढला. बराच वेळ होवूनही आरोपी बाहेर न आल्याने शौचालयाचा दरवाजा तोडल्यानंतर आरोपी पसार झाल्याचे दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आले.

आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना
पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार झाल्याची वार्ता कळताच शहरात प्रचंड खळबळ उडाली. शहर, बाजारपेठ व तालुक्यात सर्वत्र आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात आरोपी पसार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


कॉपी करू नका.