पुण्यातील आरोपींना कट्टा विकणारा उमर्टीचा आरोपीही जाळ्यात
गावठी कट्ट्यांचा कारखाना पुन्हा चर्चेत : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव : चोपडा बसस्थानकावर पुण्याच्या दोन संशयीतांकडून गावठी कट्ट्यांसह पाच जिवंत काडतुसे जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केली होती. आरोपींना हा गावठी कट्टा उमर्टीच्या संशयीताने विकल्याची माहिती आरोपींच्या जवाबात निष्पन्न झाल्यानंतर पोलिस पथक संशयीताच्या मागावर असताना मंगळवारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अवतारसिंग मोहसिंग टाक (रा.उमर्टी, ता.वरला जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान उमर्टीसह मध्यप्रदेशात अनेक ठिकाणी गावठी कट्टा बनवण्याचे कारखाने सर्रास सुरू न ते समूळ नष्ट करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
जास्त किंमतीत कट्टा विकण्याचा गोरखधंदा
संशयीत आरोपी तुषार पिताजी चव्हाण (23, रा.भोसे, ता.कर्जत, जि.अहमदनगर, हल्ली मुक्काम भेकराई , फुरसुंगी, हडपसर पुणे व संतोष अशोक माळी (21, रा. बालाजी नगर, हडपसर, पुणे) यांना बलवाडी-चोपडा बसमधून उतरल्यानंतर अटक करण्यात आली होती. चोपडा स्थानकावर झालेल्या कारवाईत आरोपींजवळ असलेल्या बॅगेत गावठी कट्टा तसेच पाच जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिस चौकशीत आरोपींनी उमर्टीच्या संशयीताकडून कट्टा खरेदी केल्याची कबुली दिली होती. पुण्यात या कट्ट्यांना मोठा डिमांड असून 50 ते 60 हजारात त्याची विक्री होत असल्याची माहिती आहे. दलाल उमर्टीसह अन्य भागातून 10 ते 15 हजारात कट्टा घेतात व पुण्यासह परीसरात तो 50 ते 60 हजारात विकतात त्यामुळे अल्पावधीत जास्त पैसे मिळत असल्याने अनेकांनी हा गोरखधंदा सुरू केल्याचीही माहिती आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक. भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील एसएसआय अशोक महाजन, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, जितेंद्र सोनवणे, शेषराव तोरे आदींच्या पथकाने केली. आरोपीला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.