भुसावळात सत्ताधारी नगरसेवकांच्या वॉर्डातच एलईडी दिवे बंद
24 तासात दिवे बदलण्याचे आश्वासन हवेत ; मुख्य रस्त्यावर दिव्यांची लपाछपी
भुसावळ : शहरातील सत्ताधारी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या प्रभागातीलच 80 टक्के एलईडी दिवे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने त्यांनी आता थेट मुख्याधिकार्यांकडेच तक्रार केली आहे. 80 टक्के दिवे बंद असून ठेकेदाराकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित दखल घेत नाही, नागरीक रोष व्यक्त करीत असल्याची तक्रार ठाकूर यांनी केली आहे. सत्ताधार्यांची ही अवस्था तर विरोधकांचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुख्य रस्त्यांवर दिव्यांची लपाछपी
नगरपालिकेने एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीसोबत सात वर्ष एलईडी दिवे बसविण्याचा करार केला होता तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसापासून शहरात एलईडी दिवे बसवण्यास प्रारंभ झाला.
एलईडी दिव्यांमुळे वीजवापर कमी होऊन 50 टक्के वीज बिलाच्या रक्कमेत बचत होणार असल्याचे तसेच फ्यूज झालेले पथदिवे 24 तासांच्या आत बदलतील, अशी ग्वाही त्यावेळी माजी मंत्री खडसेंनी दिली होती मात्र सत्ताधार्यांच्या वॉर्डातच दिवे बदलले जात नसल्याने शहरातील इतर भागाबाबत बोलायला नको, असा जनतेचा सूर आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या यावल रस्त्यासह जामनेर रोडवरील अनेक पथदिवे बंद आहेत तर काही रात्रीच्या वेळी चालू-बंद होत असल्याने या लपाछपीच्या खेळाने वाहनधारकांना मनस्ताप होत आहे. पालिकेत एलईडी दिव्याच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यासह 24 तास तक्रारी ऐकण्यासाठी मनुष्यबळ तैनात केले जाणार होते मात्र हे आश्वासनदेखील आता हवेत विरले आहे.
तीन महिन्यानंतरही दखल नाही -पिंटू ठाकूर
12 जुलै पासून संबंधित ठेकेदाराकडे बंद एलईडी दिव्यांबाबत तक्रार करीत आहे मात्र संबंधित दखल घ्यायला तयार नाही. अत्यंत बोगस एजन्सीला ठेका देण्यात आल्याने ही एजन्सी रद्द करून नव्या एजन्सीला ठेका देण्याची आपली मागणी असल्याचे नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी सांगितले. नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडेदेखील तक्रार करून उपयोग झालेला नाही. गणेशोत्सव तोंडावर असून नागरीक आपल्याला दोष देत आहेत. संबंधित दखल घेत नसतील तर त्यांनी आमच्या प्रभागातून जमा केलेल्या जुन्या ट्यूब लाईट व फ्लेक्सर्स आम्हाला परत कराव्यात, आम्ही त्या प्रभागात लावू कारण 600 रुपयांचा महागडा एलईडी आम्ही घेवू शकत नाही, असेही नगरसेवक ठाकूर म्हणाले.