वरणगावजवळ भरधाव आयशरची बसला धडक

वरणगाव- महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल आस्वादसमोर भरधाव आयशरने एस.टी.बसला धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने प्रवासी बचावले मात्र बसचे सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी आयशर गाडी चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तळवेल-भुसावळ बस (एम.एच.14 बी.टी. 0071) ही चालक किशोर सुर्यभान इंगळे (भुसावळ) वरणगावकडून भुसावळकडे आणत असताना समोर गाडी आल्याने त्यांनी गाडीचा वेग कमी केला मात्र त्याचवेळी पाठीमागून आलेल्या आशयर (क्रमांक एम.एच.18 बी.जी.1936) जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे मागील बंपरचे नुकसान होवून पत्रा फाटल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले. बस चालकाच्या फिर्यादीवरून आयशर गाडी चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास हवालदार सुनील वाणी करीत आहेत.
