भुसावळात विकासकामांच्या विषयावरून सत्ताधार्यांमध्ये ‘खडाजंगी’
पालिका सभेनंतर नगराध्यक्ष व गटनेत्यांमध्ये हमरी-तुमरी : सणालाच फुटला आगामी राजकीय नांदीचा ‘पोळा’
भुसावळ : शुक्रवारी पालिकेच्या आयोजित विशेष सभेत शहरातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनाशेजारी असलेल्या बैठक हॉलमध्ये सत्ताधारी गटनेते मुन्ना तेली व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यात विकासकामांवरून चांगलीच खडाजंगी झाली. पाहता-पाहता ही वार्ता शहरात व सोशल मिडीयावरही व्हायरल झाली. पालिका सभेत गटनेत्यांन बोलायचे असताना नगराध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही मात्र गटनेत्यांनी शहरातील अनेक स्लम भागासह झोपडपट्टी असलेल्या भागात डांबरीकरण होणार नसल्याची कैफियत मांडत तेथे आयपीएस वा पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. अजेंड्यावरील विषयात पुन्हा त्यांनी दुरुस्ती सूचवल्यानंतर सभागृहाने त्यास होकार दर्शवला होता.
सत्ताधार्यांनीच फोडला पोळा
शुक्रवारी पोळा सणाची धामधूम सुरू असताना नगराध्यक्ष रमण भोळे व भाजपा गटनेता मुन्ना तेली यांच्यात विकास कामांवरून झालेल्या हमरीतुमरीची शहरभर चांगलीच चर्चा रंगली. यापूर्वी सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारींनी सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांना अडचणीत आणले होते तर आज पुन्हा गटनेत्यांनी नगराध्यक्षांशी विकासकामांवरून वाद केल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सभेपूर्वीच मुख्याधिकारी परतल्या माघारी
शुक्रवारी पालिका सभा असताना पावणे अकरा वाजता मुख्याधिकारी करुणा डहाळे या पालिकेत पाय ठेवणार तोच काही नगरसेवकांकडून बिले मंजूर होत नसल्याने वादंग सुरू होते तर वादाची ठिणगी पडणार असल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी माघारी वळल्याने सत्ताधार्यांमधील कलगीतुरा शहरवासीयांसाठी चर्चेचा ठरला आहे. गटनेता व नगराध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आमच्या कुठलाही वाद नाही, विकासासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगून त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.