भुसावळातील गुन्हेगारीचा लवकरच नायनाट : छेडखानी रोखण्यासाठी दामिनी पथक

अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांची शांतता समितीच्या बैठकीत ग्वाही
भुसावळ : भुसावळातील गुन्हेगारीचा लवकरच नायनाट होईल शिवाय तरुणींची छेडखानी रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्याची ग्वाही डॅशिंग अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी येथे दिली. अहिल्या देवी कन्या विद्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या भुसावळात शहरात आल्यानंतर पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी ऐकायला मिळाल्या त्यामुळे शाळ तसेच महाविद्यालयाच्या आवारात यापुढे दामिनी पथक नियुक्त करण्यात येईल तसेच रोडरोमिओगिरी करणार्यांवर कठोर कारवाई झाल्याचे लवकरच शहरवासीयांना कळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील वाढती गुन्हेगारी ठेचण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जातील तसेच भुसावळातील पोलिस ठाण्यांबाहेर पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांचे नंबर यापुढे ठळक अक्षरात लावले जातील, जेणेकरून काही पोलिस दलाबाबत तक्रार असतील त्या नागरीकांना आमच्याकडे करता येतील, असेही त्या म्हणाल्या. भुसावळात कुणी कायदा हातात घेतल्यास त्यांची गय करणार नसल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार महेंद्र पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रस्तावना डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले.
