बिलोली उपविभागीय अधिकार्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात
दोन लाखांची लाच भोवली ; पंटरांमार्फत लाच मागितल्याने कारवाई
नांदेड : तक्रारदाराच्या भावाच्या नावावरील दोन रेती वाहतूक करणारे हायवा ट्रक बिलोली तहसील कार्यालयातून सोडण्यासाठी दोन लाखांची मागणी करणार्या बिलोली, जि.नांदेड उपविभागीय अधिकार्यांना नांदेड एसीबीच्या पथकाने सोमवारी अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाच प्रकरणी बिलोली उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांच्यासह खाजगी पंटर शामकुमार साईबाबु बोनगे (मुबारकनगर, निजामाबाद, तेलंगना राज्य) व श्रीनिवास सत्यनारायणा जिनकला अशोकनगर (मीरयालगुडा, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली. नांदेड डीवायएसपी विजय डोंगरे व प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी.एच.काकडे, हणमंत बोरकर, किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, अमरजितसिंह चौधरी, अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ, मारोती सोनटक्के, अनिल कदम आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.