जळगावातील प्राणघातक हल्ला प्रकरणी आरोपी जाळ्यात
सावद्याहून आरोपीच्या आवळल्या मुसक्या : चारचाकी केली जप्त
जळगाव : प्राणघातक हल्ला व हाणामारीच्या गुन्ह्यातील पसार आरोपीच्या सावदा शहरातील बिअर बारमधून मुसक्या आवळण्यात आल्या. लोमेश उर्फ निलेश युवराज सपकाळे (26, रा.आसोदा रोड, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून चार लाख रुपये किंमतीची महागडी कार जप्त करण्यात आली. आरोपीला जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मे महिन्यात घडली होती घटना
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात 17 मे 2019 रोजी किरण शंकर खरचे (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुरनं.409/2019 भादंविक 307,34 व गुरनं.408/2019 भादंवि कलम 324, 323, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील संशयीत निलेश सपकाळे हा पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू होता. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आरोपी सावद्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार सुनील जोशी, नाईक रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी सावदा शहरातील एका बिअर बारमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला जळगाव एमआयडीचे एएसआय आनंदसिंग पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले.