भुसावळ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची धुळ्यात बदली : रामसिंग सुलाणे येणार
नाशिक विभागातील 14 उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकार्यांच्या बदल्या ; बदल्यांमध्ये धुळ्यासह नंदुरबारातील अधिकार्यांचा समावेश
नाशिक : नाशिक विभागातील 14 उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे उपसचिव डॉ.माधव वीर यांनी 6 सप्टेंबर रोजी काढले. 24 तासांच्या आत बदली झालेल्या अधिकार्यांनी आपल्या पदाचा पदभार सोडावा, असे आदेशात बजावण्यात आले आहे. भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची धुळे भूसंपादन क्रमांक एकमध्ये उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी जळगाव भुसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी रामसिंग फुलाणे बदलून येत आहेत.
राज्यातील या अधिकार्यांच्या बदल्या
नाशिकचे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) उन्मेश महाजन यांची धुळे उपजिल्हाधिकारी (महसूल) पदी रीक्त पदावर बदली झाली. अहमदनगर उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांची नाशिकच्या सहाय्यक आयुक्त (प्रशासन) पदी बदली झाली. नाशिक जिल्हापुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची अहमदनगर उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. शहादा उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची चाळीसगाव विभागाच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. नाशिक गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी रमेश मिसाळ यांची धुळे जिल्हा पुरवठा अधिकारीपदी बदली झाली. नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांची सटाणा-बागलाण उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. धुळे उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची नाशिक निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली. भुसावळ उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची धुळे भूसंपादन क्रमांक एकच्या उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली. जळगाव भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी रामसिंग सुलाणे यांची भुसावळ उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची ईगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल नथू पवार यांची श्रीरामपूर उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. नाशिक उपजिल्हाधिकारी (राहप्र भूसंपादन) स्वाती थविल यांची अहमदनगर उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सात या पदावर बदली करण्यात आली तर नाशिक उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांची नाशिक उपजिल्हाधिकारी (प्रबोधिनी) तसेच नाशिक उपजिल्हाधिकारी (प्रबोधिनी) कुंदन सोनावणे यांची नाशिक उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी बदली करण्यात आली.
24 तासात पदभार सोडण्याचे आदेश
बदल्या झालेल्या अधिकार्यांनी 24 तासांच्या आत पदभार सोडून तो विभागीय आयुक्त/कार्यालय प्रमुखांकडे सोपवण्याचे आदेशात नमूद असून निवडणूक विभागाशी संबंधित अधिकार्यांनी तातडीने पदभार सोडावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. दरम्यान, बदली झालेल्या अधिकार्यांचे नवी दिल्लीत प्रशिक्षण झालेले नाही अशा अधिकार्यांसाठी 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे बदली आदेशात नमूद आहे.