भुसावळातील श्री विसर्जन मार्गाची पालिकेकडून नव्हे आमदारांकडून ‘स्वःखर्चाने’ डागडूजी
बाप्पांचे विसर्जन होणार सुखद : भक्तांसह वाहनधारकांना तात्पुरता दिलासा
भुसावळ : अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे शहरातील डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर जनतेत सत्ताधार्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत होती. शांतता समितीच्या बैठकीतही शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकार्यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रशासन व सत्ताधार्यांकडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने व अवघ्या चार दिवसांवर बाप्पांचे विसर्जन आल्याने आमदार संजय सावकारे यांनी स्व-खर्चातून यावल रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकला आहे. खडतर मार्गातून विघ्नहर्त्याचे आगमन झाले असलेतरी विसर्जन मात्र सुखर होणार असल्याचा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.
पालिकेने नव्हे आमदारांनी टाकला मुरूम
शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख वर्दळीच्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शहरवासी व वाहनधारक कमालीचे संतप्त झाले आहेत. पालिका प्रशासन व सत्ताधार्यांकडे या संदर्भात नागरीकांनी रेटा लावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने आमदार संजय सावकारे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्याने त्यांनी रविवारी स्वखर्चातून यावल रस्त्यावर मुरूम टाकला. सोमवारी या रस्त्यावरील मुरूम रोलरने दबाई केला जाणार असून त्यानंतर किमान वाहनधारकांसह बाप्पांच्या भक्तांना काही अंशी का असेना दिलासा मिळणार आहे. पालिकेने मात्र डागडूजी का केली? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे