धुळ्यातील अट्टल घरफोड्या जळगाव एलसीबीच्या जाळ्यात


जळगावात घरफोड्यांची कबुली : दोन लाख 13 हजारांचे दागिने जप्त

जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील मकरा पार्क अपार्टमेंटच्या जी विंग मधील 125 क्रमांकाच्या फ्लॅटमधील रहिवासी खुर्शिद हुसेन मजहर अली (80) हे पत्नी फिजासह घरासमोरील बिहरा प्रार्थनास्थळात कार्यक्रमासाठी गेल्याची संधी साधू चोरट्यांनी कपाटातील चार लाखांचे सोन्याचे दागिणे व चार हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या गुन्ह्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यातील अट्टल गुन्हेगार पप्पू शहाबान हसन अन्सारी यास अटक केली आहे. आरोपीने घरफोडीची कबुली देत या गुन्ह्यातील सोन्याच्या बांगड्यांसह पाच अंगठ्या मिळून दोन लाख 13 हजार 39 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. आरोपीस अधिक तपासासाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सराईत गुन्हेगाराच्या यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय चंद्रकांत पाटील, अशोक महाजन, अनिल इंगळे, संतोष मायकर, सुनील दामोदरे, भास्कर पाटील, विजयसिंग पाटील, रमेश चौधरी, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीविरुद्ध यापूर्वी जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक, मालेगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.


कॉपी करू नका.