भुसावळात धोबी समाजातर्फे फटाक्याची आतषबाजी अन् पेढ्यांचे वाटप
आरक्षणाबाबतचा अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला
भुसावळ – राज्यातील धोबी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देवून आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीचा अहवाल राज्य सरकारने केद्र सरकारकडे पाठविल्याने महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक संघटनेने शहरात सोमवारी शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
राज्यातील धोबी समाजाला 1960 पुर्वी राज्यात अनुसूचित जातीचा दर्जा होता मात्र नंतर या समाजाला अनुसुचित जातीच्या यादीतून वगळण्यात आले होते. समितीचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य धोबी परीट आरक्षण समन्वय समिती अध्यक्ष जी.डी. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धोबी समाजाने सातत्याने आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
मार्ग मोकळा मात्र शासनाची चालढकल
तत्कालीन राज्य सरकारने डॉ.दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीने शासनाला अहवाल सादर करून धोबी समाज अस्पृश्येतेचे सर्व निकष पूर्ण करतो, असा सकारात्मक अहवाल दिला होता तर धोबी समाजाला पूर्वरत अनुसूचित जातीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा होवूनही राज्य सरकारने चालढकल सुरू ठेवली. यामुळे धोबी समाज अत्यंत आक्रमक झाला होता. अखेर समाजाच्या लढ्याला यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाजाचा अनुसूचित जातीचा दर्जा देवून आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी डॉ.दशरथ भांडे समितीच्या अहवाल शिफारसीसह केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हा निर्णय होताच महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
भुसावळात समाजबांधवांचा जल्लोष
रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळयाजवळ संघटनेतर्फे फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटप करण्यात येवून जल्लोष करण्यात आला.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य नाना ठाकरे, अॅड.निलेश मोघे, योगेश चंदन, भगवान चंदन, कन्हैया चंदन, चंदन परदेशी, मानसिंग परदेशी, जितेंद्र परदेशी, दिनानाथ चंदन, मंगल शेलोडे, अरुण शिरसाठ, सुभाष शिरसाळे, राजेंद्र शिरसाळे, छाया शेलोडे, मनिषा शिंदे, रंजना परदेशी, शकुंतला परदेशी, नंदा परदेशी, कमला परदेशी, सुनंदा परदेशी, सुरेखा ठाकरे, प्रताप परदेशी, संजय परदेशी, राजेश चंदन, आनंदसिंग परदेशी, दीपक चांदेलकर, शंकर शेलोडे, शांताराम जाधव, अतुल कौसकर, प्रवीण दहिभाते, भास्कर, जामोदकर,आनंदा सुरडकर, सुरेश परदेशी, चंद्रसिंग परदेशी, मधुकर परदेशी, गणेश परदेशी, भट्टू परदेशी, पुनम चंदन आदी उपस्थित होत्या.