राजकारणातल्या ‘शिखंडीने समोर’ येवून विचारावा जाब


नामदार हरीभाऊ जावळे : पायाखालची वाळू सरकल्याने बॅनर्स लावणार्‍यांचा घेतला समाचार

रावेर : राजकारणातल्या शिखंडीची पायाखालची वाळू सरकल्यानेच त्यांनी बदनामी करणारे बॅनर्स लावले आहेत, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर येवून जाब विचारावा, अशी भावना केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष व आमदार हरीभाऊ जावळे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. रावेर-यावल मतदारसंघात आमदार हरीभाऊ जावळे व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या संदर्भात लावलेल्या बॅनर्सनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यावल-रावेर मतदारसंघाच्या सौजन्याने हे बॅनर्स लावण्यात आले असलेतरी खोडसाळपणा करणार्‍यांनी बॅनर्स लावण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेतली आहे? असा प्रश्‍न आमदार जावळे यांनी उपस्थित करीत या संदर्भात कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्याचे सांगितल्याचे ते म्हणाले.

‘शिखंडी’चे नागरीकांआड लपून राजकारण
आमदार जावळे म्हणाले की, राजकारणातल्या शिखंडीचा हा प्रताप आहे. नागरीकांच्या आडून ते वार करीत आहेत मात्र त्यांनी समोर येवून जाब विचारण्याची हिंमत ठेवावी. रावेरसह यावल तालुका शांतता व सलोखा जपणारा तालुका आहे. पराकोटीचे राजकारण आजपर्यंत येथे झालेले नाही. दुष्काळात आम्ही शेतकर्‍यांसोबत होतो वा नाही तसेच लग्नात हजेरी लावली वा नाही ? हे जनतेला ठावूक असल्याचेही आमदार जावळे म्हणाले.

बॅनर्सवर आजी-माजी आमदारांचे फोटो
मतदारसंघात ठिकाणी लावलेल्या बॅनर्सवर आमदार जावळे व माजी आमदार शिरीष चौधरी यांचे फोटो झळकवण्यात आले असून आपण यांना पाहिलेत का? असा मजकूरही त्यावर टाकण्यात आला असून एकदा निवडून आल्यानंतर दर्शन दुर्लभ झालेल्या नेतृत्वाला पुन्हा निवडून द्याल का? असा प्रश्‍नही त्यातून विचारण्यात आला आहे त्यामुळे आता हे बॅनर्स नेमके लावले कुणी? याचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसात मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.