भुसावळात राष्ट्रवादीतर्फे सतीश घुले राहणार उमेदवार !


माजी आमदार संतोष चौधरींचा दावा : शहर समस्यामुक्त होण्यासाठी गणरायाला साकडे

भुसावळ : राष्ट्रवादीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सतीश घुले वा त्यांच्या पत्नी सुनीता घुले यांना उमेदवारी दिली जाईल, असा दावा माजी आमदार संतोष चौधरी यांनी येथे केला. जामनेर रोड भागातील कन्हैयालाल प्लॉट भागातील अष्टभुजा गणेश मंडळाच्या आरतीप्रसंगी ते बोलत होते. 15 सप्टेंबरपर्यंत भुसावळातील जागेबाबत सुप्रीमो शरद पवार निर्णय जाहीर करतील, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शहरातील रस्ते, असुविधा, पाण्याची समस्या आदी समस्या सुटण्यासाठी गणरायाला साकडे घातल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, तालुकाध्यक्ष सतीश घुले, ललित भंगाळे, पवन नाले, यतीन पाटील, भुषण कोल्हे, निलेश कोळी, मयुर चौधरी, नारायण तांबट, दीपक चौधरी, वृषभ धांडे, शुभम चौधरी, अतुल बोरोले, छोटु गिरणारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चौधरींच्या वक्तव्याने राजकारण ढवळले
भुसावळची जागा राष्ट्रवादीची वाट्याला असलीतरी ती काँग्रेसने आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत तर दुसरीकडे माजी आमदार चौधरींनी घुलेंचे नाव पुढे करून राजकीय पत्ता फेकला आहे. काँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे भुसावळातून दुसर्‍यांदा नशीब आजमावत असून ही जागा काँग्रेसला सुटण्यासाठी प्रयत्नशील आहेत शिवाय काँग्रेसमधील निष्ठावंतांनीही ही जागा काँग्रेसला सोडण्यासाठी पदाधिकार्‍यांकडे आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो व काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये नेमक्या काय वाटाघाटी होतात व भुसावळची जागा नेमकी कुणाला सुटते ? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.


कॉपी करू नका.