मुक्ताईनगरात पालखी सोहळ्यात घडले वारकरी संप्रदायाचे दर्शन


विठुरायाच्या दर्शनानंतर संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे स्वगृही आगमन

मुक्ताईनगर- विठ्ठल भेटीची आस बाळगत ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात रवाना झाले होते. विठ्ठल दर्शनाने तृप्त होत वारकरी संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्यासह मंगळवारी स्वगृही परतले आहे. सकाळी 10 वाजता संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे , शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, तहसीलदार शाम गोसावी यांनी पालखी पूजन केल्यानंतर पालखी सोहळा जुन्या मुक्ताई मंदिराकडे मार्गस्थ झाला. पालखीच्या आगमनानिमित्त नवे मुक्ताई मंदिर ते जुने मुक्ताई मंदिर मार्गावर शहरवासीयांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

वारकरी संप्रदायाच्या कलाकृतींचे घडले दर्शन
पालखी मार्गावर वारकरी संप्रदाय दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण 82 भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 8 बालगट, 42 महिला गट, 32 पुरुष गट सहभागी होते भजनी मंडळांनी वारकरी संप्रदायाच्या विविध कलाकृतींचे दर्शन पालखी मार्गावर घडवले तर हरीनामाच्या नाम घोषात व टाळ, मृदुंगाच्या गजरात तसेच संगीतमय वातावरणात व्यसनमुक्ती आणि स्त्री भ्रूणहत्या व संस्कृती टिकविण्याचे आव्हान करणारे पथनाट्य सादर करण्यात आले.

लोकसहभागातून महाप्रसाद
शहरातून घराघरातून दोन लाख पोळ्या जमा करण्यात आल्या होत्या व एकत्रीत काला करून महाप्रसादाचा कार्यक्रम वारकरी व भाविकांना आयोजित करण्यात आला. अतिशय भक्तिमय वातावरणात मुक्ताई पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान, जुन्या मुक्ताई मंदिरात पंढरपुरातून मुक्ताई पालखी सोहळा स्वगृही मार्गस्थ होत असताना पालखीसोबत थेट पंढरपुराहून श्‍वानदेखील मुक्ताईनगरच्या दिशेने पालखी सोबत चालत आले. पालखी सोहळ्यागर्दीला न घाबरता हे श्‍वान आता जुन्या मंदिरावर स्थिरावले आहे.


कॉपी करू नका.