जळगावातील दोन गटातील हाणामारी : अ‍ॅड.विजय पाटलांसह तिघांना कोठडी


जळगाव : गतवर्षी नूतन मराठा विद्यालयात पाटील तसेच भोईटे गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात सुनील भोईटे यांच्या फिर्यादीवरुन दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात तब्बल एक वर्ष दोन महिने व दहा दिवसानंतर अ‍ॅड. विजय भास्कर पाटील (रा.दीक्षीतवाडी) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांडे डेअरी चौकातून मंगळवारी अटक केली होती, दुसर्‍या दिवशी याच गुन्ह्यात मनोज भास्करराव पाटील व विनोद पंजाबराव देशमुख हेही पोलिसांना शरण आले. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

वैद्यकीय प्रमाणपत्राविनाच संशयित केले हजर
सुनील भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अ‍ॅड. विजय पाटील यांच्यासह 29 जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला 19 जून 18 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अ‍ॅड. विजय पाटील यांच्यासह तिघांना दुपारी न्या. वी.न. सुंदाळे यांच्या न्यायालयात हजर केले. तपासाधिकार्यांनी कलम 307 च्या गुन्हयात संशयीताना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावीे,अशी विनंती सादर करून रिमांड रिपोर्ट व कागदपत्र न्यायालयात सादर केली. न्यायालयाने सदर कागदपत्रे अभ्यासले असता ज्या कारणासाठी कोठडी मागत होते, त्यासंदर्भात दुखापतीचे वैद्यकीय प्रमाणपत्रच नसल्याची बाब न्यायालयाने लक्षात आणून दिली. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना केल्या. पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर युक्तीवाद झाला.

वैद्यकीय कारणांमुळे विजय पाटलांना घरचे जेवण
मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मुकेश शिंपी यांनी युक्तीवादात जेव्हा घटना घडली तेव्हा संशयित हजर होता. नंतर पंधरा महिन्यापासून फरार होते. त्यांना अटक केल्यानंतर हत्यार जप्त करावयाचे असून दोन जण ताब्यात घ्यावयाचे आहे, असे सांगून पोलीस कोठडीची विनंती केली. बचावपक्षातर्फे अ‍ॅड. पी.एन.पाटील यांनी युक्तीवादात स्पष्ट केले की,फिर्यादमध्ये हत्यार असल्याचे नमूद नाही. फिर्यादीने तोंडी म्हटले आहे. घटनेला पंधरा महिने झाले. हे फरार म्हणतात. परंतु ते तर सॉमिलवरच होते. विजय पाटील यांना मधुमेह आहे. त्यांच्यावर एन्जोग्राफी तसेच बायपास करण्यात आली आहे. हत्यार जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तर सरकार पक्षातर्फे व्ही.यू.पाटील यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अ‍ॅड. पाटील यांना कोठडीत घरचा डबा देण्याची कोर्टाने मुभा दिली. तसेच आवश्यकतेनुसार त्यांना वैद्यकीय मदत देण्याचेही स्पष्ट केले आहे. न्यायालयात अ‍ॅड. पाटील समर्थकांनी गर्दी केली.


कॉपी करू नका.