राष्ट्रवादीला धक्का : खासदार उदयनराजेंचा उद्या भाजपा प्रवेश
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले शनिवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करीत आहेत. उदयनराजे यांच्या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. उदयनराजे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटदेखील घेतली होती. यानंतर राष्ट्रवादी उदयनराजेंना पक्षात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. उदयनराजे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मुंडेंनी उदयनराजे राष्ट्रवादीतच राहतील, असा विश्वासदेखील व्यक्त केला होता.
मन वळवण्याचा प्रयत्न असफल
शरद पवारांच्या आधी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत उदयनराजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन्ही भेटींचा कोणताही उपयोग झाला नाही. उदयनराजे यांनी अनेकदा स्वपक्षावर टीका केली आहे. अनेकदा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वालादेखील जमलेलं नाही त्यामुळेच त्यांना भाजपात घेतलं जाऊ नये, असं पक्षातल्या एका गटाचं मत होतं.