गिरणा धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग नाही

सोशल मिडीयावर अफवा न पसरविण्याचे नागरीकांना प्रशासनाचे आवाहन
जळगाव : गिरणा धरणातून सद्यपरिस्थितीत पाणी सोडण्यात आलेले नसून सोशल मिडीयावर कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आल्याबाबत तसेच नदीकाठावरील नागरीकांनी सतर्क रहावे, गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे अशा पोस्ट टाकून त्यासोबत धरणाचे जुने फोटो टाकण्यात येत आहे त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून संभ्रम निर्माण होत आहे, असेही उप अभियंता पाटील यांनी सांगितले.
धरणात सध्या 93 टक्के जलसाठा
गिरणा धरणात सध्या 93 टक्के पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार गिरणा धरणात 15 सप्टेंबर पूर्वी 96 टक्के पाणीसाठा झाला तरच पाणी सोडण्यात येते व 15 सप्टेंबर नंतर 100 टक्के पाणीसाठा असेल तरच पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते परंतु सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही त्यामुळे अद्याप तरी धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही असेही पाटील यांनी सांगितले. धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. येत्या काळात पाणीसाठा वाढल्यामुळे पाणी सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तसे अधिकृत कळविण्यात येईल त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असेही पाटील यांनी कळविले आहे.




