बदनामीकारक फलक लावणार्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जनतेला ठावूक
माजी आमदार शिरीष चौधरींचा टोला : कोळवदला बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा
यावल- काल-परवा काही बदनामीकारक फलकबाजी करणारे बाहेरून आलेले पाहुणे लोकप्रतिनिधी म्हणतात आपण यांना पाहिलंत का ? मात्र या लोकांना जनता चांगली ओळखून आहे शिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जनतेला ठावूक आहे, असा टोला कुणाचेही नाव न घेता माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे लगावला. ते म्हणाले की, राज्याची आर्थिक परीस्थिती अशी आहे की, राज्याचा कारभार चालविण्यासाठी आपल्याला राज्य शासनाला 20 हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागते. आपल्या तालुक्यातील व परीसराची जलपातळी खालावली आहे तर राज्याची आर्थिक परीस्थिती पाहता मेगा रीचार्ज प्रकल्प कधी पूर्ण होईल यात शंकाच आहे. कोळवदला व्ही.आय.के.ए.सहकारी सोसायटीच्या आवारात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी बुथ कार्यशाळा झाली. याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी बोलत होते.
निवडून येण्यासाठी एक-एक मत महत्वाचे
माजी आमदार चौधरी म्हणाले की, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असून सर्व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर प्रत्येक व्यक्तिपर्यंत जावून आपल्या हक्काचा प्रतिनिधी या निवडणुकीत निवडून आणावयाचा असेल तर आपल्यासाठी एक- एक मत हे महत्वाचे आहे. . पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, देशातील आणि राज्यातील शासनाच्या कारभारामुळे देशाची आर्थिक अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांना केवळ शासनाकडून निव्वळ आश्वासनाच्या पलिकडे काहीही मिळालेले नाही.
यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, राकेश तळेले, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, युवक राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष देवकांत पाटील नाना बोदडे, मसाका संचालक भागवत पाचपोळ, अनिल महाजन, गोवर्धन तापीराम बोरोले, हाजी शित्रु तडवी गुरुजी, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभाकर अप्पा सोनवणे तर आभार शेखर सोपान पाटील यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रमेश खुशाल पाटील, विलास चौधरी, प्रमोद भिरूड, बशीर तडवी, महेंद्र धांडे आदींनी परीश्रम घेतले.