जळगावात वृद्ध महिलेसह पतीवर हल्ला
बियरच्या बाटल्यांसह फायटरने केली मारहाण
जळगाव – पॅजोतून आलेल्या पाच ते सहा जणांनी घरात घुसून वृध्द महिलेसह पतीवर हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनी परीसरातील एकनाथ नगरमध्ये घडली. बियरच्या बाटल्या, फायटरने केलेल्या बेदम मारहाणीत अंबादास सुकदेव वंजारी (45) व पत्नी सुनीता अंबादास वंजारी (40) हे जखमी झाले. याप्रकरणी प्रशांत कोळी याच्यासह तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन तोळ्याची पोतही लांबविली
मेहरूण परीसरातील एकनाथ नगरातील रहिवाशी अंबादास वंजारी (45) हे आपल्या पत्नी सुनीता, दोन मुले व दोन सुनांसह राहतात. रीक्षा चालवून ते उदरनिर्वाह भागवितात. रविवारी सायंकाळी पॅजो रीक्षातून प्रशांत कोळी याच्यासह तीन जण आले. कोळी याने तु माझ्यावर केस केली होती, असे म्हणून घरातील सुनीता वंजारी यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या मारत, इतर तिघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर घरात जावून चौघांनी अंबादास वंजारी यांनाही बियरच्या बाटल्या तसेच फायरटने मारहाण केली. शेजारच्या रहिवाशांनी घराकडे धाव घेवून रक्तबंबाळ अवस्थेतही सुनीता व अंबादास वंजारी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालय गाठले व जखमींना विचारपूस करत माहिती जाणून घेतली. जखमी अंबादास वंजारी यांच्या जवाबावरुन प्रशांत कोळी यांच्यासह तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.