मुस्लीम समाजाच्या प्रगतीसाठी समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज


आमदार संजय सावकारे : भुसावळातील कुरेशी हॉलमध्ये जनजागृती कार्यक्रम

भुसावळ- अल्पसंख्यांक समाज साक्षरतेत पिछाडीवर असून शिक्षणाबाबत जनजागृतीची गरज आहे. मुस्लिम महिला आपल्या विविध आजारांवर उपचारासाठी पुरूष डॉक्टरांकडे जात नाही त्यामुळे मुस्लिम समाजाने आपल्या मुले व मुलींना चांगले शिकवून डॉक्टर व इंजिनिअर करावे, जेणेकरून त्यांच्या भावी पिढ्या साक्षर तयार होतील. समाजाला सुधारण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचेही ते म्हणाले. सोमवार, 16 रोजी शहरातील खडका रोड भागातील कुरेशी हॉलमध्ये राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

आहारात पौष्टीक भाज्यांचे प्रमाण वाढवा
आमदार सावकारे पुढे म्हणाले की, गर्भवती महिलांनी पोषण आहाराबाबत सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. पौष्टीक व ताज्या आहाराचेच सेवन करावे.
बर्‍याच महिला घरातील काही दिवसांचे शिळे अन्न खातात त्यामुळे त्यांना विविध आजार होतात. या कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगरपालिकेच्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.अर्शिया शेख, मुख्य सेविका आशा चव्हाण, वैशाली सावदेकर, उज्ज्वला खलाणेकर,पुनम पाटील,लता जाधव,मलेरियाचे तालुका पर्यवेक्षक सुनिल महाजन, डी.जी.चोपडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महिला पालकांनी बनविलेल्या विविध चविष्ठ खाद्य पदार्थांचा आमदारांनी आस्वाद घेतला व नंतर तिघांना भेटवस्तू दिल्या. यानंतर खडका रोड परिसरात राष्ट्रीय पोषण मिशन व डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली.


कॉपी करू नका.