दगडी मनवेलच्या 43 बेघरवासीयांचे अतिक्रमण नियमित
घरकुलाची जागा नसल्याने 17 वर्षांनी मिळाला न्याय
यावल- तालुक्यातील दगडी येथील 21 व मनवेल येथील 22 असा 43 बेघर वासीयांचे अतिक्रमण नियमीत करून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, जिल्हा नियोजन मंडळातील कायम निमंत्रीत सदस्य हिरालाल व्यंकट चौधरी व तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते नमुना नंबर आठचे वाटप करण्यात आले. मनवेल जि.प.शाळेत ग्रामपंचायतीमार्फत बेघरवासीयांचे अतिक्रमण कायम करुन नमुना नंबर आठचे वाटप करणे, घंटागाडी व एलईडी टीव्ही लोकार्पण करण्याचा कार्यक्रम झाला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी नियोजन मंडळाचे सदस्य हिरालाल चौधरी होते. प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी अजित थोरबोले , तहसीलदार जितेद्र कुंवर, जि.प.सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, बोराळे उपसंरपच उज्जनसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य तथा भाजपा गटनेते दीपक पाटील, महेंद्र कोळी, अरुण पाटील, पत्रकार अरुण पाटील उपस्थित होते.
17 वर्षांनी मिळाला न्याय
नियोजन मंडळ सदस्य हिरालाल चौधरी म्हणाले की, दगडी येथील 21 व मनवेल येथील 22 अशा 43 लाभार्थींना 2002 पासून घरकुल मंजूर होते मात्र हक्काची जागा नसल्यामुळे बेघरवासीयांचे होणारे हाल हा प्रश्न नियोजन मंडळ बैठकीत पं.स.सदस्य दीपक पाटील, सरपंच नरेंद्र पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे मांडल्याचे सांगितले. प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच सिंधुबाई मोरे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटील, नरहर भील, प्रताप पाटील यांच्यासह गावातील आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते घंटागाडी व एलईडीटीव्हीचे लोकार्पण करण्यात आले.प्रास्तविक सरपंच नरेंद्र पाटील तर सूत्रसंचालन वाय.पी.पाटील यांनी केले.