सिटिंग कप्प्यात चार प्रवाशांना मुभा द्यावी : प्रा.धीरज पाटील
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेनेची मागणी
भुसावळ : भुसावळ विभागात रेल्वे स्थानकाहून अनेक आरक्षित रेल्वेगाड्या सुरू आहेत. आरक्षित डब्यांमध्ये बसणार्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने जादा भाडे आकारून विशेष गाड्या सुरू केल्या, परंतु सिटिंग आरक्षित डब्यात एकाच कप्प्यात दहाच्या दहा प्रवाश्यांना प्रवासाची मुभा देत सोशल डिस्टन्सचे तीनतेरा केले आहे.
रेल्वेच्या आरक्षित डब्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
गाडी क्रमांक 01167 हटीया स्पेशल गाडीच्या डब्यात 30 पेक्षा जास्त उत्तर भारतीय नागरीक विना तिकीट व विना मास्क आहेत अशी तक्रार रविवार, 25 रोजी डीआरएम विवेक गुप्ता यांच्याकडे प्रा.धीरज पाटील यांनी केली परंतु रेल्वेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही




रेल्वे अधिकार्यांना कोरोनाचे गांभिर्य नाही
सिटिंग आरक्षित डब्यात पाहणी करून रेल्वे विभागाच्या पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नियमाचे पालन करून महागडे तिकीट काढणार्या प्रवाश्यांच्या जीवाशी हा खेळ रेल्वे प्रशासनातर्फे केला जात आहे. नागरीकही बेफिकीर असून कोरोनापासून बचावासाठी पुढाकार घेत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. भुसावळातील रेल्वे अधिकार्यांना कोरोनाचे गांभिर्य नाही असे जाणवते. सिटिंगच्या आरक्षित डब्ब्यात फक्त चार प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा द्यावी म्हणजे 2 मिटरचे अंतर प्रवाश्यांनादरम्यान राखले जाईल अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे. रेल्वेने कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.