यावल पालिकेत पाणीप्रश्‍नावरून दोघा माजी नगराध्यक्षांमध्ये शाब्दीक चकमक


यावल- शहरातील सार्वजनिक नळांना तीन ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केल्यानंतर त्यास माजी नगराध्यक्ष दीपक रामचंद्र बेहडे यांनी विरोध केल्याने सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्‍नावरून दोघा पदाधिकार्‍यांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली.

दोघा माजी नगराध्यक्षांमध्ये उडाली चकमक
शुक्रवार, 20 रोजी सकाळी 11 वाजता यावल नगर परीषदेची मासिक सर्वसाधारण सभा झाली. ा सभेत माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांनी सभेत आयत्या वेळेस शहरातील नागरीकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याची तक्रार करीत शहरातील नागरीकांना मागील सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागल्याचे सांगत अशा परीस्थितीतही नागरीक पालिकेला सहकार्य करीत असल्याचे सांगितले. परीसरात सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने येणार्‍या पुढील एक वर्षापर्यंत पुरेल इतका पुरेसा मुबलक जलसाठा असल्याने तीन ऐवजी दोन दिवसाआड सार्वजनिक नळांना पाणीपुरवठा करण्याची त्यांनी मागणी करताच माजी नगराध्यक्ष व नगरसेवक दीपक रामचंद्र बेहडे यांनी या विषयाला विरोध केला. नागरीकांकडुन पाण्याची नासाडी केली जाते शिवय काही लोकांच्या नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगत त्यांनी पाटील यांच्या मागणीला विरोध दर्शवला. पाटील यांनी शहरात नळांना दहा टक्के नागरीक तोट्या बसवत नसल्याने 90 टक्के नागरीकांवर अन्याय करणे चुकीचे असल्याचे सांगताच दोघा माजी नगराध्यक्षामध्ये शाब्दीक चकमक उडाली. नगरसेवक चौधरी यांनी मध्यस्ती करत दोघांना शांत केले. यावेळी मोकाट गुरांचा विषयाबाबत नगरसेविका रखमाबाई भालेराव यांनी मत मांडले तर नगरपालिकेचे काही व्यापारी संकुल हे वापराविना पडून असल्याने त्यांचा लिलाव करण्यात यावा, अशी सूचना अतुल पाटील यांनी मांडली. या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी, मुख्याधिकारी बबन तडवी, नगरसेवक प्रा.मुकेश येवले, असलम शेख नबी, समीर शेख मोमीन, अभिमन्यू चौधरी, नगरसेविका सकल्पना वाणी, देवयानी महाजन, रुख्मणी भालेराव, शिला सोनवणे आदी उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.