माजी गृहमंत्र्यांच्या वाढल्या अडचणी : ईडीने दाखल केला गुन्हा


मुंबई : माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत कमी व्हायला तयार नाहीत. कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने चार आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली असताना आता देशमुख यांच्याविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांची चिंता वाढली आहे. दरमहा 100 कोटींच्या वसुली टार्गेट प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी 5 एप्रिल रोजी पदाचा राजीनामा दिला होता.

एकीकडे चौकशी दुसरीकडे गुन्हा
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या.कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली असून देशमुख यांना या चौकशीला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील व माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली आणि त्यांच्या घरी झाडाझडतीही घेतली. दरम्यान, 21 एप्रिल रोजी सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात 3 मे रोजी याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने चार आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !