26 ते 29 सप्टेंबरदरम्यान बँका राहणार बंद
मुंबई- बँकांशी संबंधित कोणतेही व्यवहार असल्यास ते 25 सप्टेंबरपूर्वीच करून घ्या, कारण 26 ते 29 पर्यंत बँका बंद राहणार आहेत. विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार ठप्प होणार आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आहे, 29 सप्टेंबरला रविवार असल्यानं त्यादिवशीही बँकांचं कामकाज ठप्पच राहणार आहे. 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसून 1 ऑक्टोबरला आता बँकांची कामं करावी लागणार आहेत.
पाच दिवस चालणार संप
बँकेचे अधिकारी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हा निर्णय मागे घेण्यासह अधिकार्यांच्या पगाराचे पुनरीक्षण, मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी देण्याऐवजी एनपीए खात्याची वसुली करून त्याचा फायदा छोट्या कर्जदारांना देणे, अतिरिक्त शुल्क वसुली बंद करावी आणि बँकांचे व्यवहार आठवड्यातून पाच दिवस करण्याची एआयबीओसीची मागणी आहे. या मागण्यांसाठी एआयबीओसीच्या बॅनरखाली नागपूर चॅप्टरशी जुळलेले विविध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यांच्याकडे बँकांचे अधिकार असल्यामुळे या दिवसात व्यवहार होणार नाहीत. दुसरीकडे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने बँकांचे विलिनीकरण न करण्याच्या मागणीसाठी 22 ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सिंडिकेट बँकेच्या कर्मचार्यांनाही शुक्रवारी विलीनीकरणाच्या विरोधात आणि अन्य मागण्यांसाठी निदर्शने केली.
बँकिंग व्यवहार राहणार ठप्प
बँक अधिका-यांचा 26 आणि 27 सप्टेंबरला संप, 28ला चौथा शनिवार आणि 29ला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यानंतर 30 सप्टेंबरला बँकेच्या अर्धवार्षिक लेखा व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त राहतील. त्यामुळे 1 ऑक्टोबरलाच बँकांची कामं करावी लागणार आहेत. तसेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. याशिवाय सर्वच बँकांच्या एटीएममध्ये रोखीअभावी ग्राहकांना स्वत:च्या व्यवहारावर निर्बंध आणावे लागतील. अधिकार्यांनी सलग सुट्यांचे नियोजन करून 26 आणि 27 सप्टेंबरला जाणीवपूर्वक संप पुकारल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. अधिकार्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल..