भुसावळात पुन्हा संशयावरून महिलांना मारहाण
भुसावळ- मुले पळवण्याच्या संशयातून काही दिवसांपूर्वी भिक्षुकांना मारहाण झाल्याची घटना घडली होती तर ही घटना ताजी असतानाच शहरातील जाम मोहल्ला परीसरात दोन महिला मुले पळवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा नागरीकांना संशय आल्याने या महिलांना जमावाने मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत या दोन महिलांची सुटका करीत त्यांना बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. समजलेल्या माहितीनुसार, भोपाळ येथील दोन महिला कपडे विक्रीसाठी शहरातील जाम मोहल्ला परीसरात फिरत होत्या मात्र कुणीतरी या महिला मुले पळवण्यासाठी आल्याची आवई उठवल्याने जमावाने या महिलांना मारहाण केली. बाजारपेठ पोलिसांनी या महिलांना बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले मात्र त्यांच्याविरुद्ध कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे न आल्याने त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.