जळगाव रेल्वे स्थानकावरून प्रवाशाचा मोबाईल हिसकावणारे भामटे जाळ्यात


भुसावळ- अप सुरत पॅसेंजरने अमळनेरला निघालेल्या प्रवाशाचा सहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल दोघा भामट्यांनी लांबल्याची घटना 21 रोजी रात्री 11.40 वाजता घडली होती. या घटनेत फिर्यादीने आरोपींचा पाठलाग केल्याने त्याचा रेल्वे रूळात पाय अडकून तो कापला गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर जळगावच्या दोघा भामट्यांना अटक करण्यात आली. तक्रारदार जगदीश दगा खैरनार (41, रामेश्‍वर कॉलनी, हनुमान मंदिरासमोर, जळगाव) हे 21 रोजी रात्री 11.40 वाजता सुरत पॅसेंजरने अमळनेर जात असताना आरोपी सुलतान उर्फ बीडी युसूफ शहा (19, गेंदालाल मिल, जळगाव) व जुबेर उर्फ डबल शेख भिकन (18, गेंदालाल मिल, जळगाव) यांनी मोबाईल हिसकावून पळ काढला मात्र त्यांचा पाठलाग करताना खैरनार यांचा पाय कापला गेला. त्यांच्यावर आता आर्किड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खैरनार यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, मधुकर न्हावकर, हवालदार अजीत तडवी, जयकुमार कोळी, शैलेश पाटील आदींनी आरोपींना 21 रोजी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास
उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे करीत आहेत.


कॉपी करू नका.