विलेपार्लेत एमबीएच्या तरुणीवर नोकरीच्या आमिषाने बलात्कार

मुंबई : विलेपार्लेमध्ये बँकेत नोकरी लावण्याचे आमिषाने एमबीए झालेल्या 28 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. जुहू पोलिसांनी साहिलसिंग अरोरा याला अटक केली. तक्रारदार तरुणी मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. एमबीए पूर्ण झाल्यानंतर तिने कामानिमित्त मुंबई गाठली. मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर पेईंगगेस्ट म्हणून ती मुंबईत वास्तव्यास होती. खासगी नोकरीच्या पगारातून बचत होत नसल्याने तिची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे एखादी चांगली नोकरी मिळावी यासाठी ती अनेकांच्या संपर्कात होती.चांगल्या नोकरीसाठी तिने मित्र-मैत्रिणींकडे विचारणा करण्यासोबतच ऑनलाइन नोकरीचा शोधदेखील सुरू केला. नोकरी न मिळाल्यास तिने एप्रिल महिन्यातच गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचदरम्यान जुलैमध्ये ती ऑनलाइन नोकरीच्या शोधात असताना अरोराच्या संपर्कात आली. आरोपीने तिला अंधेरीतील एका नामांकित बँकेत एचआर म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यात महिना 30 हजार रुपये पगाराचे आश्वासन दिले. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवला.
हॉटेलमध्ये बोलावून केला अत्याचार
तिला 19 तारखेला रात्री 11 च्या सुमारास मुलाखतीसाठी विलेपार्ले पश्चिमेकडील किंग्ज इंटरनॅशनल हॉटेलच्या रूम नं. 511 मध्ये बोलावून घेतले. तिनेही चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या विश्वासाने तेथे जाण्याचे ठरविले. ती मुलाखतीसाठी हॉटेलवर जाताच, अरोराने मुलाखत घेण्याच्या नावाखाली तिच्याशी जवळीक साधली. तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करत घर गाठले. घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगून, जुहू पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करीत, अरोराला अटक केली आहे. अरोराने यापूर्वीही असा प्रकार केला आहे का? या दिशेने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
