सातार्‍यातून शरद पवारांनी उमेदवारी केल्यास अर्जच भरणार नाही


उदयनराजे भोसले यांचे सूचक वक्तव्य : बोलताना गहिवरले

सातारा : शरद पवार जर निवडणुकीला उभे राहिले तर मी उमेदवारी अर्ज भरणारच नाही. फक्त त्यांनी (शरद पवारांनी) एकच गोष्ट करावी. दिल्लीतला बंगला आणि गाडीची मला मुभा द्यावी, असे माजी खासदार उदयनराजे म्हणाले. शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी बोंबलत फिरायला मोकळा. त्यांनी निवडणुकीला उभं राहावं आणि मला आजमावून बघावं, त्यांनी मला सांगावं, मी नाही ऐकलं तर मला बोला, असे आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केले. सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची निवडणूक होणार आहे.

उत्तर देताना उदयनराजे गहिवरले
शरद पवारांबद्दल बोलताना उदयनराजे हळवे झाले. उदयनराजे म्हणाले की, शरद पवार माझ्यासाठी काल आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. माझ्या डॅडींनंतर (वडिलांनंतर) मला सर्वात जास्त प्रेम पवार साहेबांनी दिलं आहे. हे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले होते. एरवी डॅशिंग असणारे, ‘स्टाईल ईज स्टाईल’ म्हणणारे, डायलॉगबाजी करणारे उदयनराजे आज चक्क माध्यमांसमोर रडताना दिसले.


कॉपी करू नका.