मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही : संभाजीराजे भोसले
रायगड : आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत, मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल, अशी परखड भूमिका खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी जाहीर केली. रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.
न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
संभाजीराजे भोसले म्हणाले की, मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवं की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचं. कोविड संपल्यानंतरदेखील तुम्ही ठोस पावलं उचलली नाहीत तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेंना मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो, असं देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.



