सातपुडा निवासिनी मनुदेवी येथे 29 पासून नवरात्रोत्सव


यावल- सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे येत्या 29 सप्टेंबर रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली मनुदेवी मंदिराच्या सभागृहात करण्यात आली होती. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस.टी.महामंडळ, वनविभाग, पोलीस, आरोग्य विभाग, महसुल विभागाचे अधिकारी तसेच मनुदेवी संस्थानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मनापुरीजवळ होणार खाजगी व महामंडळ बसेसचे पार्किंग
खाजगी वाहनांना पार्किंगसाठी मनुदेवी संस्थानने चार एकर जागेवर मानापुरी या आदिवासी गावाजवळ व्यवस्था केली आहे. नवरात्रोत्सवात संपूर्ण दहा दिवस बसेसची सोय करण्यात येणार असून चिंचोलीपासुन मनुदेवी जाणार्‍या भाविकांना बुधवार, 2 ऑक्टोबरपासून काही बसेस पार्किंग या ठिकाणी सोडतील तर काही बसेस पार्किंग ते मनुदेवी मंदिर प्रवाशांची वाहतूक करणार आहेत. नवरात्रोत्सवात यावल आगाराच्या 20 तर चोपडा, रावेर, अमळनेर, भुसावळ, जामनेर, जळगाव येथुन ही वेळ पडल्यास 10 बसेस मागविण्यात येणार आहे. यासाठी पार्किंग स्थळी संस्थानचे वतीने पत्र्याचे शेड व उद्घोषणासाठी माईक स्पीकर आदी व्यवस्था तसेच भाविकांना ऊन पाऊस संरक्षणासाठी मंडप टाकण्यात येईल. पार्किंग स्थळापासुन मनुदेवी मंदिरापर्यंत दहा रूपये एसटी भाडे लागणार आहे.

खाजगी वाहनाना मंदिरापर्यंत बंदी
मनुदेवी येथे जिल्ह्यातून लाखो भाविक आपल्या खाजगी वाहनांनी दर्शनाला येतात त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून खाजगी वाहनाना मंदिरापर्यंत जाण्यास बंदी करण्यात आली. नवरात्रोत्सवात नऊ दिवस चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, कासारखेडा, आडगाव गावाबाहेरून जाणारा मनुदेवी रस्त्यावर रहिवासी रस्त्यावरच बैलगाडी तसेच गुरे-ढोरे बांधत असल्याने हा रस्ता मोकळा करण्याचे आदेश नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी ग्रामसेवकांसह सरपंचांना दिले. रस्त्यांवर वाहने फसू नये यासाठी मुरूम टाकण्याचे आदेश देण्यात आले असून भाविकांच्या दर्शन बारीसह विविध सुविधांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी नायब तहसीलदार आर.के.पवार, यावल पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, आगारप्रमुख एस.व्ही.भालेराव, जी.पी.जंजाळे, किनगाव वैद्यकीय अधिकारी मनिषा महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी.डी.तायडे किनगाव मंडळाधिकारी एस.टी.जगताप, मनुदेवी संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, सचिव नीळकंठ चौधरी व सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.


कॉपी करू नका.