भुसावळात वृक्ष उन्मळला : तासभर वाहतूक ठप्प
भुसावळ- शहरातील खडकारोड भागातील हॉटेल फिरदोस समोरील गुलमोहराचा वृक्ष कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मुसळधार पाऊस सुरू असताना गुलमोहराचा वृक्ष वीज वाहिन्यांवर आदळल्याने या परीसरातील वीजपुरवठा ठप्प झाला तर वाहतूकदेखील तब्बल तासभर ठप्प झाल्याने वाहनधारकांचे हाल झाले. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल पाऊण तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील खडकारोडवरील रजा चौक परीसरात असलेल्या हॉटेल फिरदोस समोरील गुलमोहराचा वृक्ष 11 केव्ही लाईनवर कोसळून जमिनीवर आडवा पडला. सायंकाळी पाऊस थांबल्यानंतर नागरीकांनी मदतकार्य करुन रस्त्यावर अडथळा ठरणारे कोसळलेले झाड बाजूला सारण्यास सुरवात केली. यामुळे सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान बंद झालेल्या खडकारोडवरील दुसर्या बाजूची वाहतूकदेखील सुरळीत झाली.