पहिले लग्न लपवून केले दुसरे लग्न : नागपूरच्या विवाहितेविरुद्ध धरणगावात गुन्हा


धरणगाव : पहिले लग्न झाले असतानाही दुसरे लग्न केल्याची बाब उघड झाल्याने नागपूरच्या आचल अजयराव देशमुख (20, वॉर्ड क्रमांक तीन, लता मंगेशकर रोड, नागपूर) विवाहित तरुणीविरुद्ध धरणगाव गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विवाहित तरुणीला अटक केल्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या एका युवतीचा रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी विठ्ठल मंदिरात लग्न झाले होते तर अवघ्या तीन दिवसात या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न करीत 27 रोजी एरंडोल गाठले मात्र ग्रामस्थांनी समजूत घालून तिला पुन्हा बोरगावात आणले तर या बाबीनंतर धरणगावातील युवकासोबत देखील असाच प्रकार घडल्याचे पाटील यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी खातरजमा केल्यानंतर एकाच तरुणीला दोघांशी विवाह केल्याची बाब उघड झाली. दरम्यान, या तरुणीचे याच आठवड्यात चाळीसगावच्या तरुणाशी लग्न लावून दिले जाणार असल्याची चर्चा पुढे आली आहे.

अन् बिंग फुटले
50 हजार रुपये खर्चून रवींद्र पाटील यांनी या युवतीशी लग्न केले असलेतरी युवती गावात रहायला तयार नव्हती व सातत्याने नागपूर येथे जाण्यासाठी सासरच्यांना तगादा लावत होती. 27 रोजी नागपूरमधील लता मंगेशकर रोड, भीमनगर, इसासनी भागातील विवाहित तरुणीने बोरगावातील सासूशी एकेरी भाषेत बोलत शिवीगाळ केली शिवाय पती रवींद्र पाटीलशी वाद घालत कुणाला काही एक न सांगता घर सोडले. शोधाशोध केल्यानंतर एरंडोलमधून या तरुणीला बोरगावात आणण्यात आले मात्र याचवेळी धरणगावातील युवकाने लग्न केल्यानंतर नागपूरातील तरुणी पसार झाल्याची बाब रवींद्र यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी सचिन सुभाष वाघ (धरणगाव) यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दोघाही युवकांनी एकाच तरुणीशी लग्न केल्याचे उघड झाले. दरम्यान, या प्रकरणी रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार आचल अजयराव देशमुख (20, वॉर्ड क्रमांक तीन, लता मंगेशकर रोड, नागपूर) या विवाहित तरुणीविरुद्ध पहिले लग्न केले असता दुसरे लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी कलम 495, 417, 294, 323, 352, 506 आयपीसी 112/117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक प्रकरणात या तरुणीच्या धरणगावच्या पहिल्या पतीसह बोरगावच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांना साक्षीदार करण्यात आले आहे.

नागपूरातील टोळी सक्रिय
ग्रामीण भागातील युवकांचे विवाह जुळवून देण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असून या टोळीचे दलाल लोक अविवाहित लोकांच्या संपर्कात येवून त्यांना 50 हजार ते एक लाखांचा गंडा घालतात. पारंपरीक पद्धत्तीने लग्न लावून दोन दिवस मुलीला सासरी राहू दिले जाते मात्र पहिल्या मुळाच्या नावावर तरुणीला गावी घेवून जावून माहेरी पाठवले जात नाही, असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. दरम्यान, बोरगावतील युवकाची फसवणूक करणार्‍या विवाहित युवतीने राजू कोतले, निशांत पटुले, अंकुश पटुले यांनी मला बोरगावात आणून लग्न लावून दिल्याचा आरोप केला आहे. तालुक्यासह खान्देशात अशा अनेक मुली आणल्या गेल्या व त्यांनी काही दिवसातच पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील युवकांची फसवणूक करणार्‍या दलालांचा आता पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


कॉपी करू नका.