भुसावळ शहरातील 163 मंडळांकडून दुर्गोत्सवाची स्थापना
शहराची बाजारपेठ फुलली : उपवासाच्या साहित्याची मोठी आवक : सजावटीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू
भुसावळ- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी शहर व बाजारपेठ हद्दीत तब्बल 163 मंडळांकडून दुर्गोत्सवाची स्थापना केली जाणार आहे. पोलिस प्रशासनातर्फे यंदा ऑनलाईन मंडळांना परवानगी देण्यात येत असून ज्यांनी ऑनलाईन परवानगी घेतलेली नाही त्यांनी ती घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. दरम्यान, घटस्थापणेच्या पूर्वसंध्येला शनिवारी शहराचा बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलला होता तर सायंकाळी उशिरापर्यंत वाजत-गाजत दुर्गा देवीच्या मूर्ती मंडळात दाखल झाल्या.
फळांची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक
स्त्री शक्तीच्या आराधनेचा कालावधी असलेल्या नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुषदेखील नऊ दिवस उपवास करतात, व्रतस्थ राहतात. काही जण एकवेळ जेवून तर काही जण दोन्ही वेळ केवळ फळे किंवा उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे सध्या बाजारपेठेत साबूदाणा, शेंगदाणे, शेंगाड्याचे पीठ, वरीचे तांदूळ, खजूर, विविध प्रकारची फळे अशा साहित्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
‘रेडी टू कुक’ पदार्थांना मागणी
सध्या बहुतांश महिला नोकरदार असल्याने उपवासाच्या भाजणीचे पीठ बनविण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे साबूदाण्याचे, पीठ, वरीचे पीठ, शेंगाड्याचे पीठ, राजगिर्याचे पीठ, उपवासाची भाजणी, थालीपीठाचे पीठ अशा ‘रेडी टू कुक’ पदार्थांना महिला वर्गाकडून अधिक मागणी आहे. या शिवाय तयार बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, बटाटा चिवडा, साबू चिवडा या तयार पदार्थांनी घराघरांत स्थान मिळविले आहे.
यंदा मंडळांना ऑनलाईन परवानगी
शहरातील 163 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळातर्फे घटस्थापना केली जाणार आहे तर सार्वजनिक मंडळांना पोलिसांपरी ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. ज्या मंडळाकडे परवानगी नाही, अशांनी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोलिसांच्या वेबसाईटवरून परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कन्या विद्यालयात आज शारदेची स्थापना
शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच दिवसीय शारदेची स्थापना केली जाणार आहे. शाळेत रविवारी सकाळी नऊला संस्थेचे अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे यांच्या हस्ते पूजा होणार आहे. शाळेत विविध स्पर्धाही होतील.
बाजारपेठेत लाखोंची उलाढाल
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवारी शहरातील बाजारपेठ विक्रेत्यांनी गजबजली होती. बाजारात झेंडूची फुले, घट, मातीचे दिवे, डेअरीत दुध, तूप, दही खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती तर रस्त्यावर पूजेचे साहित्य घट विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली.
पुरातन महालक्ष्मी मंदिरात विविध कार्यक्रम
शहरातील खडकारोड भागातील पुरातन महालक्ष्मी मंदिराला नवसाला पावणारे मंदिर म्हणून ख्याती आहे. 2001 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धरानंतर मंदिर परीसरात वृक्षारोपण करण्यात आल्याने परीसर हिरवाईने नटला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते आरती होणार आहे. अष्टभुजा देवी, तुळजापूर देवी, तापी नगरातील देवीचे मंदीरासह अन्य मंदीरांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शंभूराजे ग्रुपतर्फे भव्य आरास उभारणी
शहरातील गांधी नगरातील नवनिर्माण मंडळ संचलित शंभूराजे ग्रुपतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त भव्य आरारसची उभारणी करण्यात आली आहे. आकर्षक उंच मूर्तीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दत्तु आवटे यांच्या हस्ते स्थापना करण्यात येणार असल्याचे आयोजक गौरव राजेंद्र आवटे यांनी कळवले आहे.