मीराबाई चानूला मिळणार एक कोटी अन् सरकारी नोकरीत स्पेशल पोस्ट
नवी दिल्ली : भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. विशेष म्हणजे मणीपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असून तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा केली.
राज्य सरकारकडून 1 कोटीचं बक्षीस
मणिपूर सरकारनं आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देखील पारितोषिकाची घोषणा केली होती. त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला 1.20 कोटी आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना 1 कोटी रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला मणिपूर सरकारकडून 1 कोटी रुपायांचं पारितोषिक मिळणार आहे. म्हणजेच ऑलिम्पिकच्या रौप्य पदकासह मीराबाई चानू हिला आता एकूण 1 कोटी 40 लाख रुपायंचं पारितोषिक देखील मिळणार आहे. यासोबत इतर काही विभागातूनही मीराबाई हिला पारितोषिकांची घोषणा केली जाऊ शकते.



