भुसावळात 163 मंडळांनी केली दुर्गेची मनोभावे स्थापना
खरेदीनिमित्त शहराची बाजारपेठ फुलली : रात्री उशिरापर्यंत दुर्गोत्सव स्थापनेचा जल्लोष
भुसावळ : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी शहर व बाजारपेठ हद्दीत तब्बल 163 मंडळांकडून दुर्गोत्सवाची मनोभावे स्थापना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत देवीची मूर्ती सवाद्य मंडळात आणून विधीवत पूजा सुरू होती तर भाविकांचा उत्साहही यानिमित्त ओसंडून वाहताना दिसला. पोलिस प्रशासनातर्फे यंदा ऑनलाईन मंडळांना परवानगी देण्यात आली. दरम्यान, रविवारी शहराचा बाजार असलातरी नवरात्रोत्सवानिमित्त अधिक चैतन्याचे वातावरण दिसून आले व ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली होती. आदिशक्ती श्री संत मुक्ताईचा घटस्थापनेच्या दिवशीच जन्म दिवस असल्याने विविध धार्मिक कार्यक्रम मुक्ताईनगरात झाले.
अहिल्यादेवी कन्या विद्यालयात उत्साहात स्थापना
शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच दिवसीय शारदेची स्थापना रविवारी सकाळी नऊला संस्थेचे अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी संस्था सदस्य श्रीधर खणके, भावे उपस्थित होत्या. पाच दिवसीय शारदोत्सवात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानतर शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदा छत्रपती शिवरायांचे मावळे या विषयावर प्रेरणादायी आरास साकारण्यात येणार आहे. शारदोत्सव यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्राची देसाई, पर्यवेक्षिका निर्मला सुराणा व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेत आहेत.