माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाल्यानंतर बुधवारी दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी बासुरी यांनी सुषमा यांना मुखाग्नी दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपा नेते मुलायमसिंह यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह विदेशातीलही विविध मान्यवरांनी सुषमा यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ‘जब तक सूरज चांद रहेगा, दीदी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी वातावरण अधिकच भावुक बनलं. अत्यंत शोकाकुल वातावरणात सुषमा यांची अंत्ययात्रा निघाली आणि लोधी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.




